Monday , October 2 2023
Breaking News

‘बीएसएनएल’मध्ये कामगार कपातीचा निर्णय

54,451 कर्मचार्‍यांना फ टका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या ‘बीएसएनएल’ला रुळावर आणण्यासाठी ‘बीएसएनएल’ने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षांची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच ‘बीएसएनएल’ने तयार केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी देताच या प्रस्तावानुसार सुमारे 54 हजार कर्मचार्‍यांची ‘बीएसएनएल’मधून सुटी करण्यात येणार आहे.

बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील 50 वर्षांवरील कर्मचार्‍यांच्या स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार करण्यात आली आहे. हा प्रस्ताव येत्या एक-दोन दिवसांतच केंद्रीय मंत्रिडळाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात येणार असल्याचे बीएसएनएलच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)मध्ये 1.76 लाख, तर एमटीएनएलमध्ये 22 हजार कर्मचारी आहेत. येत्या पाच-सहा वर्षांत एमटीएनएलमधील 16 हजार आणि बीएसएनएलमधील 50 टक्के कर्मचारी निवृत्त होणार असल्याचे सांगण्यात येते. बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील स्वेच्छा निवृत्तीमुळे क्रमश: 6 हजार 365 कोटी आणि 2 हजार 120 कोटींची बचत होणार आहे. विशेष म्हणजे ही स्वेच्छा निवृत्ती योजना गुजरात मॉडेलच्या धर्तीवर बनवण्यात आली आहे. गुजरातमध्ये कर्मचार्‍यांना पूर्ण करण्यात आलेल्या प्रत्येक सेवावर्षासाठी 35 दिवसांचे वेतन, तसेच निवृत्तीपर्यंत राहिलेल्या वर्षांसाठी 25 दिवसांचे वेतन देण्यात आले आहे.

सध्या बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय 60 वर्षे आहे. त्यात दोन वर्षांची कपात करून ते 58 एवढे करण्यात येणार आहे. व्हीआरएस आणि निवृत्ती वयातील कपातीमुळे बीएसएनएलमधील एकूण 54 हजार 451 कर्मचार्‍यांना घरी बसावे लागणार असल्याचे समजते.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply