Breaking News

चांगल्या सुरुवातीनंतर भारताची पडझड

दुसर्‍या दिवसअखेर 2 बाद 96 धावा; सिडनी कसोटी

सिडनी : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवसअखेर भारताने 2 बाद 96 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथचे शतक (131) आणि मार्नस लाबूशेन (91) व विल पुकोव्हस्कीची (62) अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने सुरुवात चांगली केली होती, पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल माघारी परतले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टी सांभाळली.

दौर्‍यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा हा शुबमन गिलसोबत मैदानावर आला. या दोघांनी 70 धावांची दमदार भागीदारी केली. दोघेही शांत आणि संयमी खेळ करीत होते, पण जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बचावात्मक फटका खेळताना रोहित झेलबाद झाला. त्याने 77 चेंडूंत तीन चौकार आणि एक षटकार लगावत 26 धावा केल्या. शुबमन गिलने डाव पुढे नेत आपले पहिले कसोटी अर्धशतक झळकाविले, मात्र त्यानंतर लगेचच तोही झेलबाद झाला. 101 चेंडूंत आठ चौकारांसह त्याने 50 धावा केल्या.

त्याआधी पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे डावावर वर्चस्व होते. सलामीवीर पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेन यांनी अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मात्र भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखले. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन दोघे चांगला खेळ करीत होते, पण लाबूशेन 91 धावांवर बाद झाल्यावर स्मिथने एकट्याने बाजू लावून धरली. लाबूशेननंतरच्या सर्व फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची निराशा केली. मॅथ्यू वेड (13), कॅमेरॉन ग्रीन (0), टीम पेन (1), पॅट कमिन्स (0), नॅथन लायन (0) हे सारे फलंदाज स्वस्तात परतले. मिचेल स्टार्कने फटकेबाजी करीत 24 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने चार, जसप्रित बुमराह व सैनीने प्रत्येकी दोन, तर मोहम्मद सिराज याने एक बळी टिपला.

स्मिथला सूर गवसला; शतकी खेळी

भारताविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने दमदार शतक झळकावत संघाला तीनशेपार मजल मारून दिली. लाबूशेनननंतर एका बाजूने गडी बाद होत असताना किल्ला लढवत स्मिथने आपले शतक पूर्ण केले. त्याने 226 चेंडूंत 16 चौकारांसह 131 धावा केल्या. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडजा याने सुंदर क्षेत्ररक्षण करून स्मिथला तंबूत धाडून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपुष्टात आणला. या शतकासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक आठ षटके लगावण्याचा विक्रम स्टीव्ह स्मिथने रचला. त्याने सर गॅरी सोबर्स, सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण या सार्‍यांमध्ये कमी डावांत आठ शतके झळकाविण्याचा विक्रम करीत त्याने यादीत अव्वल स्थान पटकाविले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचे षटकारांचे शतक

भारतीय फलंदाज रोहित शर्माने विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचे शतक साजरे करणार्‍या पहिल्या फलंदाजाचा मान पटकाविला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी एकाही फलंदाजाला करता आली नाही. इयॉन मॉर्गन (63), ब्रेंडन मॅक्युलम (61), सचिन तेंडुलकर (60), महेंद्रसिंह धोनी (60) यांनाही असे करता आले नाही. ख्रिस गेलनंतर एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध षटकारांचे शतक पूर्ण करणारा रोहित पहिलाच खेळाडू आहे. गेलने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 130 षटकार खेचले आहेत. त्यानंतर रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. या खालोखाल गेलने न्यूझीलंडविरुद्ध 87 षटकार, तर शाहिद आफ्रिदीने श्रीलंकेविरुद्ध 86 षटकार लगावले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply