Breaking News

अल्पवयीन बेपत्ता मुलीचा दोन तासांत लागला शोध

पेण : प्रतिनिधी

येथील 12 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी सोमवारी  (दि. 4) दुपारी 3.45च्या सुमारास आपल्या पालकांना न सांगता तिच्या आईचा मोबाइल घेऊन घरातून निघून गेली होती. सर्वत्र शोध घेऊनसुद्धा ती सापडली नाही. पालकांनी संध्याकाळी पेण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अल्पवयीन बेपत्ता मुलीला श्रीवर्धन येथून ताब्यात घेतले.   सदर मुलगी अल्पवयीन असल्याने पेण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास महिला उपनिरीक्षक धनश्री पवार यांच्याकडे देण्यात आला. निरीक्षक बाळकृष्ण जाधव, सहाय्यक निरीक्षक संतोष पिंपळे, हवालदार बेलेकर, नाईक, सावंत यांचे पोलीस पथक मुलीचा शोध घेत होेते. सदर मुलीकडे असलेला मोबाइल लोकेशन आणि रामवाडी बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही मुलगी श्रीवर्धनकडे जाणार्‍या बसमध्ये चढल्याचे दिसून आले. पोलिसांनी सदर बसचालकाशी संपर्क साधून ही मुलगी बसमध्ये असल्याची खात्री केली. त्यानंतर श्रीवर्धन पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. तेथील पोलिसांनी एसटी स्थानकात बस पोहचताच मुलीस ताब्यात घेतले व पेण पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पेण पोलिसांनी मुलीस पालकांच्या ताब्यात दिले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply