Breaking News

रिलायन्स व्यवस्थापनाला निर्णय घ्यायला एवढा वेळ का?; लोकशासन संघटनेचा सवाल

नागोठणे : प्रतिनिधी

कंपनीच्या कंत्राटी सेवेत कायमस्वरूपी काम करण्यास आमचे प्रकल्पग्रस्त तयार असल्याचे लोकशासन आंदोलन समितीने स्पष्ट केले होते. मात्र, रिलायन्स व्यवस्थापनाला निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागत आहे, असा सवाल संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी केला आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज 43 वा दिवस आहे. मध्यरात्री येथे मुसळधार पाऊस पडला असला तरी, आंदोलनात सहभागी झालेला एकही प्रकल्पग्रस्त येथून न उठता येथेच थांबून राहिला होता. अवकाळी पाऊस, रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसभर ऊन सहन करीत येथे बसल्याने अनेक आंदोलनकर्ते सर्दी खोकला या व्याधीने त्रस्त झाले असले तरी, रिलायन्स व्यवस्थापनाला दया कशी येत नाही, असा सवाल प्रकल्पग्रस्तांकडून केला जात आहे. शुक्रवारी 43 व्या दिवशी सरचिटणीस मिणमिणे यांचेशी संवाद साधला असता,  640 प्रकल्पग्रस्त कंपनीत नोकरी मिळण्यासाठी शिल्लक राहिले आहेत. शासकीय पातळीवर झालेल्या चर्चेनुसार यापैकी 351 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी कंत्राटी सेवेत काम देण्यात रिलायन्स व्यवस्थापन तयार झाले आहे. एकूण 640 प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित राहिले असले तरी त्यापैकी अजून 131 प्रकल्पग्रस्तांना सेवेत घ्यावेत म्हणजे 640 ऐवजी 482 प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळू शकेल अशी आमची मागणी आहे व तसा प्रस्ताव यापूर्वीच दिला आहे. परंतु रिलायन्सचे व्यवस्थापन तसेच शासकीय अधिकारी अद्याप उत्तरच देत नसल्याचे मिणमिणे यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply