सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीत युद्धपातळीवर लसीकरण
पाली : प्रतिनिधी
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील गावे व वाड्यांमधील कोंबड्या रोगामुळे मृत्यूमुखी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. हे निदर्शनास आल्यानंतर सरपंच उमेश यादव आणि व दुग्ध व्यावसायिक दत्ता इंदुलकर यांनी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांना संपर्क करून ही माहिती कळवली. त्यामुळे येथील कोंबड्यांचे लसीकरण युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. परिणामी हजारो कोंबड्यांचे प्राण वाचले असून आर्थिक नुकसानदेखील टळले आहे.
डॉ. कोकरे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब जगदीश गायकवाड आणि विलास जाधव या कर्मचार्यांना सूचना देऊन उपलब्ध साठ्यामधून 30 डिसेंबरपासून लसीकरण चालू केले आहे. दरम्यान लस कमी पडली म्हणून ग्रामपंचायतीने पनवेलमधून लस खरेदी करून लसीकरण चालू ठेवले आहे. याकामी ग्रामसेवक गोरठ, कर्मचारी सचिन मुंढे, गणेश महाले तसेच अमर पोंगडे यांनी विशेष मेहनत घेतली.