ऑस्ट्रेलियाविरुद्ध विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी
सिडनी : वृत्तसंस्था
दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढून तिसरी कसोटी अनिर्णीत राखत बॉर्डर गावसकर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करीत सामना वाचवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात 334 धावांपर्यंत मजल मारली.
पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीने 161 चेंडूंचा सामना केला, तर अश्विनने विहारीला संयमी साथ देत 128 चेंडू खेळून काढले. एकवेळ भारतीय संघ सामना गमावेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र या जोडीने संयमी आणि चिवट फलंदाजी करीत सहाव्या गड्यासाठी 259 चेंडूंत 62 धावांची भागीदारी करीत संघाचा पराभव टाळला. ऑस्ट्रेलियाने विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. कर्णधार पेन याने तर स्लेजिंगचाही वापर केला, मात्र अश्विन-विहारी यांनी आपला संयम ढळू दिला नाही. त्यांच्या फलंदाजीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला, पण त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने सुरुवातीला सावध खेळ केला. नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. पंतने 12 चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी करीत 118 चेंडूंमध्ये 97 धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने 205 चेंडूत 77 धावा केल्या.
ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण पंत व पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली. रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त होता. त्यानंतर हनुमा विहारीला दुखापत झाली. त्याला धावणेही कठीण झाले होते. त्यामुळे अश्विन व विहारीने सामना वाचवण्याच्या दृष्टीने फलंदाजी केली. या जोडीने संयमी फलंदाजी करीत अखेर सामना वाचवला.
विहारीने नाबाद 23, तर अश्विनने नाबाद 39 धावांची खेळी केली.
पंतवर कौतुकाचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटीत 407 धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिले. भारताकडून ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चांगली खेळी केली. विशेषत: पंतने तडाखेबाज खेळी करीत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. दबावाच्या क्षणी मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतने सुरुवातीला सावध खेळ केला, पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली.
त्याने 12 चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी करीत 118 चेंडूंमध्ये 97 धावा कुटल्या. त्याच्या खेळीच्या बळावरच ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. पंतच्या या
खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.