Breaking News

अलिबागमधून महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे  उमेदवार महेंद्र दळवी यांनी गुरुवारी (दि. 3) भव्य मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास चावरी, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, भाजप अलिबाग- मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, मानसी दळवी यांच्यासह हजारो शिवसैनिक, भाजप, आरपीआय कार्यकर्ते, पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी 11 वाजता सुमन क्रिएशन चाळमळा येथून कारमधून महेंद्र दळवी यांची रॅली निघाली होती. या वेळी दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना अभिवादन करीत रॅली  अलिबागमध्ये आली. संपूर्ण अलिबाग शहर भगवे झाले होते. उमेदवारी अर्ज भरून आल्यानंतर झालेल्या सभेत अ‍ॅड. महेश मोहिते व महेंद्र दळवी यांची भाषणे झाली.

आपण सर्वांनी एकदिलाने काम करून अलिबाग -मुरूड विधानसभा मतदारसंघात शेकापचा पराभव करू या. आम्ही जसे अलिबागमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार आहोत, तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही पेणमध्ये भाजपच्या उमेदवाराचे काम केले पाहिजे. ही जबाबदारी महेंद्र दळवी यांची आहे. त्यांनी ती पार पाडावी, असे अ‍ॅड. महेश मोहिते या वेळी म्हणाले.

शेकापच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. आम्ही अलिबाग मुरूडच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच निवडणुकीत उतरलो आहोत. महायुती भक्कम आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे.

– महेंद्र दळवी, महायुती उमेदवार,

 अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply