महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच फईम अब्दुल सत्तार आरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही त्यांना अटक केली जात नाही. या प्रकरणाची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. महाडमधील बिरवाडी कुंभारवाडा मोहल्ला येथील अब्दुल गफूर इब्राहिम आरकर यांचे भाऊ नझीर इब्राहिम आरकर हे जिवंत असतानाही त्यांचा मृत्यू दाखला ग्रामपंचायतीच्या शिक्क्यानिशी बनवून शिवसेनेचे तत्कालीन उपसरपंच फईम अब्दुल सत्तार आरकर यांनी सिटी सर्व्हे नंबर 1267 व 1266 या जमीन मिळकतीत चुकीच्या व खोट्या नोंदी करून जमीन हडप करण्याचा प्रकार केला. जमिनीवर वाणिज्य व निवासी इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे व ते विक्रीच्या तयारीत आहेत. अनधिकृत, बेकायदेशीर व मालकत्व नसल्याने महाडच्या गटविकास अधिकार्यांनी सदर इमारतीच्या बांधकामाला स्थगिती आदेश दिले आहेत. तरीही बांधकाम अद्याप थांबविण्यात आलेले नाही. तत्कालीन उपसरपंच फईम अब्दुल सत्तार आरकर यांना बिरवाडीचे ग्रामसेवक व महाडचे गटविकास अधिकारी पाठीशी घालत आहेत. त्यामुळेच आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य अब्दुल गफूर इब्राहीम आरकर यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र उपसरपंच फईम अब्दुल सत्तार आयकर यांना अटक करण्यात आली नाही. केवळ राजकीय दबावापोटीच पोलीस यंत्रणेकडून कारवाईस विलंब होत आहे, असे माजी ग्रामपंचायत सदस्य अब्दुल गफूर इब्राहीम आरकर यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सखोल चौकशी करून दोषींविरोधात उचित कारवाई करून त्या संदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा, असे पत्र रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना मंगळवारी (दि. 12) दिले आहे.