कर्जत ः बातमीदार
आम्ही आमची किती दिवस पक्षाकडून अवहेलना करून घ्यायची, त्याला पण काही अंत असतो. त्यामुळेच आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता आमची कोणीही कितीही मनधरणी केली तरी आम्ही भाजप सोडून जाणार नाही आणि त्यामुळे घरवापसीचे त्यांनी विसरून जावे, असे शिवसेनेमधून भाजपत प्रवेश केलेल्या माथेरान येथील सर्व 10 नगरसेवकांनी गुरुवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेकडून आमिषे दाखवण्यात आली, पण हाती काही लागत नसल्याने त्यांच्याकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचा आरोपही भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांनी या वेळी केला. थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान सध्या तेथील राजकीय घडामोडींमुळे चांगलेच तापले आहे. माथेरान नगर परिषदेतील विद्यमान उपनगराध्यक्षसह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये गेलेले नगरसेवक-नगरसेविका पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा माथेरानमध्ये मुद्दामहून घडवून आणण्यात येत आहे. त्यामुळे भाजपवासी झालेले उपनगराध्यक्ष आकाश चौधरी आणि इतर नऊ नगरसेवकांनी भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेस नगरसेवक संदीप कदम, राकेश चौधरी, नगरसेविका प्रतिभा घावरे, प्रियांका कदम, सुषमा जाधव, सोनम दाभेकर, ज्योती सोनावळे, रूपाली आखाडे, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवसेनेचे माजी शहर संघटक प्रवीण सकपाळ, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, प्रदीप घावरे, डी ग्रुपचे अध्यक्ष किरण चौधरी आदी उपस्थित होते. थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान हे जगप्रसिद्ध स्थळ आहे. या ठिकाणचा विकास व्हावा, जगभरातून येणार्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि येथील पर्यटन सुस्थितीत चालावे यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपच्या केंद्र सरकारला आम्ही 10 विकासकामांचा अजेंडा दिला असून ती सर्व कामे येत्या चार महिन्यांत मंजूर होतील आणि आम्ही भाजपक्षचे कमळ माथेरान नगर परिषदेवर फडकवू, असा विश्वास उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी व्यक्त केला. माथेरान नगर परिषदेमध्ये नगरसेवकांना मानसन्मान मिळत नसल्याच्या तक्रारी उपनगराध्यक्ष म्हणून माझ्याकडे येत होत्या, पण आपण सत्तेत आहोत व लोकांनी एकहाती सत्ता आपल्याला दिली असल्याने मी कायम त्या सर्वांची मनधरणी केली. माथेरानमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. त्यातील काही कामे ही निकृष्ट दर्जाची करण्यात येत असल्याने ती आम्ही थांबवली, मात्र त्यानंतर विद्यमान नगराध्यक्षांनी काही लोकांनी कामे थांबवली असा उल्लेख केला. जर विकासकामे होताना ती निकृष्ट दर्जाची झाली तर पुढे निवडणुकीला सामोरे जाताना जनतेसमोर आपण ती निकृष्ट दर्जाची कामे घेऊन जाणार का? हे पक्षाला पटवून दिले, पण पक्ष काहीही करीत नव्हता, असेही उपनगराध्यक्ष चौधरी म्हणाले. माथेरानमधील शिवसेनेच्या दोन गटांतील वाद मी स्वतः पुढाकार घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला. त्यामुळे अखेर आम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमधून कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडणार नाही यावर आम्ही सर्व ठाम असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात का प्रवेश केला याबद्दल बोलताना, ‘त्यांना आता आमची आठवण झाली आहे. आम्ही साडेचार वर्षे विकासकामे करा, चांगली कामे करा, पक्षातील मतभेद टाळा, असे ओरडून सांगत होतो, पण कोणी लक्ष दिले नाही आणि आता घरवापसीच्या अफवा पसरवत आहेत. हे सर्व कशासाठी,’ असा सवाल शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख कुलदीप जाधव यांनी या वेळी केला. आमच्या विरोधातील चर्चा या केवळ अफवा आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. माथेरानमध्ये शिवसेनेत दोन गट झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची कोंडी झाली. गेली साडेचार वर्षे आम्ही ही कोंडी सहन करीत होतो तसेच याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांकडे अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या, मात्र हे गटतट आजवर कोणाला सोडवता आले नाही. उलट नगरसेवकांचा भरसभेत अपमान करण्यात येतो. तेव्हापासून ही खदखद सर्वांच्या मनात होती. शिवसेनेने आम्हाला खूप काही दिले, पण तेव्हाची शिवसेना आज राहिलेली नाही, तर ती गटागटांत विभागली गेली आहे. गेल्या साडेचार वर्षांचा हा कोंडमारा सहन न झाल्याने आम्ही सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही जाधव यांनी सांगितले. या वेळी भाजपमध्ये प्रवेश करणार्या सर्व 10 नगरसेवकांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले.