लाबूशेन, नटराजनची शानदार कामगिरी
ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था
भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेनच्या शतकाच्या जोरावर 5 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करीत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठविला.
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने डेव्हीड वॉर्नरची विकेट घेत यजमानांना धक्का दिला. त्यानंतर आठव्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला 5 धावांवर बाद करीत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी 17 धावांवर बाद करीत भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.
वॉर्नर-हॅरीस बाद झाल्यानंतर मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तिसर्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी भारताकडून पदार्पण करणार्या वॉशिंग्टन सुंदरने फोडली. त्याने स्मिथला 36 धावांवर बाद केले. स्मिथनंतर आलेल्या मॅथ्यू वेडने लाबूशेनसह चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पदार्पण करणार्या टी. नटराजनने वेडला बाद करीत ही जोडी फोडली. दरम्यान, लाबूशेनने कसोटीमधील पाचवे शतक पूर्ण केले. वेडला बाद केल्यानंतर नटराजनने लाबूशेनची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला.
दिवस संपण्याआधी भारताला नव्या चेंडूवर विकेट घेता आली नाही. खेळ संपला तेव्हा कॅमरून ग्रीन 28, तर कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद होते. भारताकडून नटराजनने सर्वाधिक दोन, तर सिराज, ठाकूर आणि सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताच्या अडचणी वाढल्या
दुखापतींचे ग्रहण लागलेल्या भारतीय संघाला अखेरच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात चार बदलांसह मैदानात उतरावे लागले. या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमरा आणि आर. अश्विनशिवायच मैदानात उतरला आहे. त्यातच नवदीप सैनीला दुसर्या सत्रात दुखापत झाली आणि त्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले.
निर्णायक कसोटीत कोणाचा विजय?
दरम्यान, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एक-एक असे बरोबरीत आहेत. अॅडलेडमधील पहिला कसोटी सामना भारताने गमावला. त्यानंतर मेनबर्न कसोटीत भारताने जबदस्त कमबॅक केले. सिडनीमधील तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली. त्यामुळे आता चौथ्या आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीच्या निकालावरूनच बॉर्डर-गावसकर मालिका कोण जिंकणार याचा फैसला होणार आहे.