पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ
पनवेल ः प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या ’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेच्या पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीला शुक्रवारपासून (दि. 15) पिंपरी-चिंचवड येथे प्रारंभ झाला आहे.
या प्राथमिक फेरीचे उद्घाटन लेखक, दिग्दर्शक, सिने कलाकार अभिजित झुंझारराव आणि सिने कलाकार राहुल वैद्य यांच्या हस्ते झाले. या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य अमोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ, पुणे केंद्रप्रमुख संकेत मोडक आदी उपस्थित होते. नाट्य चळवळ वद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा कार्यरत आहे. त्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकिका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात.
स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. दरवर्षी ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात होत होती, पण यंदा कोरोनामुळे स्पर्धा जानेवारीमध्ये होत आहे.
पिंपरी-चिंचवड, पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून, तीन दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. पनवेल केंद्रातील प्राथमिक फेरी 21 ते 24 जानेवारीपर्यंत चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय खांदा कॉलनी येथे होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
पारितोषिकांचे स्वरूप
प्रथम क्रमांक – 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक
द्वितीय क्रमांक – 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक – 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक – 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक/अभिनेता/अभिनेत्री/लेखक/
संगीत/नेपथ्य/प्रकाश योजना/ उत्तेजनार्थ अशी विविध
पारितोषिकेही असणार आहेत.