पोलादपूर : प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगामार्फत पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आणि पोलादपूर ते वाई सुरूर राज्य मार्गावर रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता स्थिर सर्वेक्षण पथकाच्या टीम-1कडून रात्रंदिवस वाहनांची झाडाझडती सुरू आहे.
निवडणूक आयोगाने अधिग्रहित केलेले तालुका कृषी कार्यालयाचे दोन कर्मचारी, दोन वाहतूक पोलीस, एक पोलीस आणि एक कॅमेरामन अशा या एसएसटी पथकाचे प्रमुख पोलादपूर तालुका कृषी विभागाचे विकास कोसबे हे करीत असून सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत, तर तेथून पुढे मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत दुसरे कर्मचारी उपस्थित होईपर्यंत हे पथक डोळ्यांत तेल घालून वाहनांची कसून तपासणी करीत आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर 11 मार्च 2019 पासून या एसएसटी पथकाकडून तपासणीचे काम सुरू झाले असून शिमगोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांप्रमाणेच विकएण्डला महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळी जाणार्या पर्यटकांना या तपासणी पथकाचा त्रास वाटला, तरीही कर्तव्यभावनेतून सर्वांनीच वाहन तपासणीकामी सहकार्य केले असल्याची माहिती या वेळी विकास कोसबे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली. वाहतूक पोलीस राज पवार, विश्राम गोंधळी, सावंत यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारीही एसएसटी पथकाला सहकार्य करीत आहेत. पोलादपूर पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीपासून काही अंतरावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ वाहनांची कसून तपासणी करताना महिला आणि वृद्धांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे या वेळी पोलिसांनी सांगितले.