Breaking News

‘निर्भीड लेख’चा खोटारडेपणा पुन्हा उघड

अशुद्ध पाणीपुरवठ्याशी टीआयपीएल आणि महापालिकेचा संबंध नाही!

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील मिडलक्लास हौसिंग सोसायटीत टीआयपीएल कंपनी करीत असलेल्या गटार दुरुस्तीच्या कामामुळे जलवाहिन्यांना अडथळा होऊन घरोघरी अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याची नवी आवई दैनिक ‘निर्भीड लेख’ने उठविली आहे, मात्र प्रत्यक्षात हा प्रकार टीआयपीएल कंपनीमुळे नव्हे; तर प्लॉट नं. 47वरील यशोबाळकृष्ण इमारतीची अंतर्गत जलवाहिनी सडल्याने घडला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘निर्भीड लेख’चा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

अर्धवट माहिती घेऊन दिशाभूल करण्यासाठी ‘निर्भीड लेख’ कुप्रसिद्ध आहे. त्याची प्रचिती वारंवार येत आहे. शहरातील नागरिकांना पावसाळ्यात गैरसोयींना तोंड द्यावे लागू नये यासाठी महापालिकेच्या वतीने टीआयपीएल कंपनीच्या माध्यमातून मिडलक्लास हौसिंग सोसायटीत गटार बंदिस्तीचे काम प्रगतिपथावर आहे, परंतु ‘दुसर्‍याचे झाले बरे, तर आपले काही नाही खरे’ या भीतीपोटी टीआयपीएल कंपनीला सातत्याने अकारण बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्याची ओरड हा त्याचाच एक भाग आहे.

वास्तविक यशोबाळकृष्ण इमारतीची अंतर्गत जलवाहिनी गेली अनेक वर्षे न बदलल्यानेच सडली आहे. तिच्याशी टीआयपीएल कंपनीच्या कामाचा काहीएक संबंध नाही. जिथे यशोबाळकृष्णची जलवाहिनी खराब झालेली आहे, त्या ठिकाणी टीआयपीएलने खोदकामही केलेले नाही. असे असताना अनधिकृतरित्या केलेल्या तक्रारीचा हवाला देत ‘निर्भीड लेख’ने ‘टीआयपीएल’विरोधात पुन्हा एकदा बोंब उठवली आहे.

दरम्यान, संपूर्ण मिडलक्लास सोसायटीत खरोखरंच अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे का, याबाबत माहिती जाणून घेतली असता यात काहीच तथ्य नसल्याचे आढळून आले. ‘निर्भीड लेख’चे संपादक ज्या मिडलक्लास सोसायटीतील यशोबाळकृष्णपासून चारएक इमारती पुढे असलेल्या ‘कनक स्मृती’मध्ये राहतात, तेथील रहिवाशांनीच आम्हाला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होत आहे, असे सांगून या संपादक महाशयांच्या खोटारडेपणाचा बुरखा टराटरा फाडला आहे. त्यामुळे ते तोंडावर आपटले आहेत.

…स्वत: मात्र कोरडे पाषाण

दैनिक ‘निर्भीड लेख’चे संपादक स्वत:ला विद्वान समजून जनहिताच्या गप्पा मारत असतात. प्रसंगी सार्‍या दुनियेला उपदेशाचे डोसही पाजतात, मात्र याच महाशयांनी आपल्या इमारतीसमोरील रस्त्यावर भलीमोठी ट्रॉली उभी करून ठेवली आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असते, ज्याचा त्रास वाहनचालक, प्रवासी व पादचार्‍यांना होतो. जवळच शाळा असल्याने लहानगे विद्यार्थी, तसेच पालकांनाही मार्गक्रमण करणे कठीण होते. याची जाण स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेणार्‍या या महाशयांना नाही का?

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply