अलिबाग : शेकापचे जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. या उपकाराची जाणीव या दोन्ही नेत्यांनी ठेवावी, असा इशारा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवारी (दि. 5) अलिबाग येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील व अनिकेत तटकरे हे दोघेही भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे दोघेही राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांनी दोन पावले मागे येऊन देशाचा विचार करावा आणि ते करतील, असे सांगून शेकापचे जयंत पाटील हे 2014च्या निवडणुकीत सुनील तटकरेंबद्दल काय बोलले याबाबत आपणाला माहीत आहे, असे पालकमंत्री चव्हाण म्हणाले.
काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा प्रसिध्द केला आहे तो देशाच्या दृष्टीने घातक आहे. रायगडमधील श्रीवर्धनमधून आलेल्या स्फोटकांमुळे मुंबईवर संकट आले होते. अशी घातपाती व देशद्रोही कृत्ये करणार्या व्यक्तींवर यापुढे देशद्रोहाचे खटले भरले जाणार नसतील, तर अशा काँग्रेसवाल्यांना आपण मतदान करणार का, असा सवालही ना. चव्हाण यांनी या वेळी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशात व राज्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग, रायगड किल्ला संवर्धन, जेएनपीटीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, बंदरे, पोर्ट, मच्छीमारांचा प्रश्न या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात राहणारा प्रत्येक नागरिक देशाच्या हितासाठी धनुष्यबाणालाच मतदान करेल. रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा महायुतीचे उमेदवार अनंत गीते हेच खासदार म्हणून निवडून येतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.