Breaking News

मोदीजी ही बनेंगे पंतप्रधान!

पालकमंत्र्यांचा विश्वास; पेणमध्ये मेळावा

पेण : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड सुरू असून, लोकहिताच्या विविध योजना गेल्या पाच वर्षांत राबवून केंद्र व राज्य सरकारने प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा ‘अब की बार मोदी सरकार’ या 2014च्या घोषणेऐवजी आता ‘अब मोदीजी ही बनेंगे देश के पंतप्रधान’ अशी लोकभावना संपूर्ण देशभरात तयार झाली आहे. सर्व बुथप्रमुख व कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे बजावून रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. 5) येथे केले.

भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्ष बुथप्रमुखांचा मेळावा पेण येथील आगरी समाज मंच सभागृहात घेण्यात आला. त्या वेळी पालकमंत्री बोलत होते.

या मेळाव्याला भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, सरचिटणीस बंडू खंडागळे, जि. प. सदस्य अमित जाधव, कामगार सेल अध्यक्ष विनोद शहा, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन, उपजिल्हाप्रमुखनरेश गावंड, भाजप युवा नेते वैकुंठ पाटील, अनंत पाटील, व्ही. व्ही. पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच नाना महाडिक, तरणखोप ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत पाटील, पेणचे प्रफुल्ल शहा, केदार ढवळे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

आपल्या भाषणात पालकमंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, शेकापचे नेते जयंत पाटील मागील 2014च्या लोकसभा निवडणुकीत खरे बोलत होते की, सुनील तटकरे यांनी भ्रष्टाचार केला आहे, परंतु आता ते 100 टक्के खोटे बोलत आहेत. रायगडच्या विकासाचा सर्वनाश करण्याचे या लोकांनी ठरवले आहे. महायुतीचे तसे नाही. सत्यमेव जयते हा भाजपचा नारा आहे. आमचे काम चोख, आमचा हिशेब चोख, आमचे सर्वकाही चोख आहे.

गीतेसाहेबांचा विजय मागच्या वेळी कमी फरकाने झाला. कारण त्यावेळी रविशेठ पाटील त्यांच्याकडे होते. आता ते आमच्याकडे आहेत. चुकीच्या माणसांची साथ सोडून रविशेठ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार व त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेली प्रगती पाहून भाजपमध्ये आलेत. बॅ. अंतुले साहेबांचे काम करणारे देशाचे हित जाणतात, समजतात, म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पेण विधानसभा मतदारसंघात पुढचा आमदार महायुतीचाच असेल, असा दावाही पालकमंत्र्यांनी केला. या वेळी त्यांनी आमदार धैर्यशील पाटील यांना संबोधून सांगितले की, खरोखरंच या आमदारांचे पे्रम आपल्या देशावर असेल, तर ते नक्कीच भ्रष्टाचारी उमेदवाराला मदत करणार नाही व देशप्रेमीला मदत करतील.

भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पेण मतदारसंघातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या समस्या आम्ही निश्चितपणे सोडवू. शेतकर्‍यांसाठी राबविलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, खारबंदिस्तीचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या याबाबत आम्ही व आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे आता उपोषण करणार्‍यांना कोणतेच कार्यक्रम हाती घेता येणार नाहीत एवढी मजबूत स्थिती भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने या वेळी केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार साजरा करेल. सर्वांनी जबाबदारीने मतदारांना सरकारच्या योजनांची माहिती द्यावी तसेच धनुष्यबाणाला मत देण्याचे आवाहन करावे. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सांगितले की, मला पडलेली 62 हजार मते, किशोर जैन यांना पडलेली 44 हजार मते व भाजपची 18 हजार मते मिळून सव्वा लाख मते आपल्याकडे आहेत. विरोधकांची मजल 75 ते 80 हजार मतांपर्यंत जाईल. यामुळे गीतेसाहेबांना या मतदारसंघातून 45 हजारांचे मताधिक्य मिळेल. माझे कार्यकर्ते भाजपच्या विचारप्रणालीशी जुळवून घेतील व ताकदीने कामे करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply