पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकपरिषद व पनवेल येथील आश्रय सोशल फाऊंडेशन सेवाभावी संस्था मागील 15 वर्षांपासून देहविक्रय करणार्या महिला, बार गर्ल्स, एमएसएम आणि ट्रान्सजेंडर या अतिजोखीम गटासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन व संरक्षण व्हावे म्हणून प्रयत्नशील आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुक्तीदिन व पंधरवडा आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा बालविकास अधिकारी रायगड आणि लोकपरिषद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देहविक्रय करणार्या महिलांना व सदर व्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना आधार कार्ड, रेशनकार्ड व मतदान ओळख पत्र, काढून देण्यासाठी पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उद्घाटन तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते झाले.
या समारंभाला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रायगड, जिल्हा चिकित्सक, जिल्हा रुग्णालय रायगड, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध अधिकारी, रायगड, चिकित्सक उपजिल्हा रुग्णालय पनवेल, समुपदेशक आयसीटीसी पनवेल, दक्ष नागरिक संघाचे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड व संचालिका विमल गायकवाड आणि संस्थेचे व्यवस्थापक ऊर्मिला यादव, शिल्पा हालनकर, कार्यकर्ते रुकया बारगीर, दिक्षा गावंड मनिषा पवार, संजिवनी सावंत, मेघा लोखंडे, करन निकम, मिनल मोहिते, जया जाधव, कल्पना ठोकल, अश्विनी लोंढे, प्रज्ञा कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये तहसीलदारांच्या हस्ते 36 महिलांना रेशन कार्ड, 21 महिलांना आधार कार्ड देण्यात आले. त्यापैकी पाच मुली व चार मुले आणि 12 महिलांना आधार कार्ड मिळाले आहे. 10 महिलांना मतदान ओळख पत्र देण्यात आले जेणेकरुन या महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.