कर्जत : बातमीदार
माथेरानच्या पर्यटनाला नवीन झळाळी मिळत आहे, ती नगरपालिकेकडून होत असलेल्या सुशोभीकरणामुळे. येथे होत असलेल्या पॉईंट सुशोभीकरणामध्ये नामशेष होत असलेल्या मलंग पॉइंटला गतवैभव मिळाले आहे.
माथेरान नगरपालिका 11 पॉइंटच्या सुशोभीकरणाचे काम करणार आहे. त्यापैकी सनसेट पॉईंटकडे जाणार्या रस्त्यामध्ये लुईझा पॉईंटच्या बाजूला असलेल्या मलंग पॉइंटचे सुशोभीकरण सुरू आहे. निसर्ग सौंदर्याने भरलेला असल्याने या पॉइंटला महत्व आहे. या पॉईंटवरून मलंगगडचा डोंगर न्याहाळता येतो. तसेच पनवेल, मुंबईचा भाग दिसतो.
नगरपालिकेकडून होत असलेल्या विशेष रस्ता अनुदानातून हे सुशोभीकरण होत आहे. या सुशोभिकरणामध्ये पॉईंटकडे जाणारा रस्ता जांभा दगडाचा करण्यात येणार आहे. पॉइंटच्या टोकाला जांभा दगडाचे कठडे असून त्यावर बसण्यासाठी ग्रॅनाईड लावले जाणार आहेत. हे पूर्ण काम पर्यावरण पूरक होत आहे. ग्रॅनाईड बाकड्यांमुळे झाडाखाली निवांत बसून पर्यटक निसर्ग न्याहाळू शकतात.