Breaking News

संजीवनी अकादमीला विजेतेपद

मुंबई : प्रतिनिधी

संजीवनी क्रिकेट अकादमी संघाने आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमीला 23 धावांनी हरवून टोटल कप या 13 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान पटकावला. आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमीने नाणेफेक जिंकून संजीवनीला प्रथम फलंदाजी दिली. या संधीचा लाभ उठवताना यष्टीरक्षक फलंदाज ओमकार पाटणकर (59) आणि कर्णधार आदित्य बालीवडा (55) यांनी 14.4 षटकांत 105 धावांची सलामी दिली. बालीवडा याने 48 चेंडूंत 55 धावा करताना सात चौकार आणि एक षटकार ठोकला, तर पाटणकर याने 54 चेंडूंत 59 धावा करताना पाच वेळा चेंडू सीमापार केला. बालीवडा बाद झाल्यानंतर पाटणकरने निहार मगरेसह (18) आणखी 36 धावांची भर टाकून संघाला निर्धारित 20 षटकांत 3 बाद 153 धावांचे लक्ष्य उभारून दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमीच्या तुषार सिंघ (18) आणि असिफ खान (22) यांनी 28 धावांची सलामी दिली, मात्र ऑफ स्पिनर अरिंजय लोखंडे याने तुषार सिंघचा त्रिफळा उडवत संजीवनीला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार यासीन सौदागर (43) आणि आसिफ खान यांनी दुसर्‍या विकेटसाठी 40 धावांची भर टाकली, पण डावखुरा फिरकी गोलंदाज सौरीश देशपांडेने आसिफ खानला त्रिफळाचीत करीत त्यांना आणखी एक धक्का दिला. या धक्क्यातून आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमी संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. यासीन सौदागर एका बाजूने संघासाठी खिंड लढवत असताना दुसर्‍या टोकाकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही आणि त्यांचा डाव 19 षटकांत 130 धावांत आटोपला. अरिंजय लोखंडेने 16 धावांत 3; तर सौरीश देशपांडेने 9 धावांत 2 बळी मिळवत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. संजीवनीच्या डावात सर्वाधिक 59 धावा आणि दोन यष्टीचीत करणार्‍या ओमकार पाटणकर याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

संजीवनी संघाने उपांत्य फेरीत टोटल वेंगसरकर अकादमीला 101 धावांनी हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती; तर आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमी संघाने एमआयजी संघावर 7 विकेटनी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सीनियर कौन्सिल राजू पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या वेळी वेंगसरकर यांनी खेळाडूंना खेळाबरोबरच अभ्यासावरही विशेष लक्ष देण्यास सांगितले आणि यापुढे अकादमीत प्रवेश देताना शाळेचे प्रगती पुस्तकही पाहिले जाईल, असा प्रेमाने दम दिला. अभ्यासात तसेच खेळातही अथक मेहनतीला पर्याय नाही. त्याचप्रमाणे कुठलाही शॉर्टकट येथे उपयोगी पडणार नाही, असाही सल्ला त्यांनी दिला.

संक्षिप्त धावफलक : संजीवनी क्रिकेट अकादमी- 20 षटकांत 3 बाद 153 (ओमकार पाटणकर 59, आदित्य बालीवडा 55, निहार मगरे 18), वि. वि. आयडीबीआय फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर अकादमी- 19 षटकांत सर्व बाद 130 (तुषार सिंघ 18, आसिफ खान 22, यासीन सौदागर 43; अरिंजय लोखंडे 16/3, सौरीश देशपांडे 9/2).

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply