यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू झाला आहे. चेन्नई येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या हॉलमध्ये आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव गुरुवारी पार पडला. या लिलावाकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष होते. टीव्ही आणि अन्य माध्यमांनीही बाकी सार्या बे्रकिंग न्यूज मागे सारत आयपीएलच्या लिलावाच्या बातम्यांनाच प्राधान्य दिले. हे साहजिकच आहे. जगात काहीही घडत असले तरी भारतात क्रिकेटचाच टीआरपी सर्वांत जास्त असतो.
जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला.. असे एक जुने चित्रपटगीत आहे आणि ते विक्रमवीर सुनील गावसकर यांनी गायलेले आहे. ऐकण्यास ते चित्रपटगीत वाटले तरी भारतीयांच्या दृष्टीने ते वस्तुस्थितीचे निदर्शकच मानले पाहिजे. क्रिकेट आणि चित्रपट म्हटले की भारतीय मने फुलून येतात. सार्या समस्या, चिंता-काळज्या दूर सारून क्रिकेटवेडी भारतीय जनता टीव्हीकडे डोळे लावून बसते. त्यातून आयपीएलसारखा क्रिकेटचा उत्सव असेल तर बघायलाच नको. आयपीएलच्या हंगामाची सुरुवात नेहमीच खेळाडूंच्या लिलावाने होते. देशोदेशीचे परदेशी क्रिकेटपटू आणि अस्सल भारतीय मातीत तयार झालेले आपले क्रिकेटपटू यांच्या सरमिसळीनिशी सहा ते आठ संघ एकमेकांशी झुंजतात. आयपीएलचा करंडक यंदा कोण जिंकणार यावर हजारो कोटींच्या पैजा लागतात. एकंदरीत आयपीएलचा हंगाम हा जल्लोषाचा काळ असतो. गुरुवारी चेन्नई येथे झालेल्या लिलावात 292 देशी-परदेशी क्रिकेटपटूंनी आपल्या नावांची नोंदणी करून विक्रीस उपलब्ध असल्याचे जाहीर केले होेते. त्यानुसार न्यूझीलंडच्या ख्रिस मॉरिस या अष्टपैलू क्रिकेटपटूस तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांचा भाव मिळाला. त्याची किमान आधारभूत किंमत 75 लाख रुपये एवढीच होती, परंतु राजस्थान रॉयल्सच्या संघाने पंजाब किंग्जच्या मालकांशी चढाओढ करीत मॉरिसला आपल्या तंबूत घेतले. गेल्या हंगामापर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब अशा घसघशीत नावाने वावरणार्या पंजाब संघाने यंदा पंजाब किंग्ज असे सुटसुटीत नाव धारण केले आहे. या संघाने लिलावामध्ये जवळपास 34 कोटी रुपये खर्च करून महागडे तसेच नवोदित क्रिकेटपटू आपल्या पदरात घेतले आहेत. चर्चेत राहिलेले आणखी एक नाव म्हणजे तामिळनाडूचा तडाखेबाज फलंदाज महंमद शाहरुख खान. या शाहरुख खानला पदार्पणातच सव्वापाच कोटी रुपये इतकी कमाई झाली. एवढी मोठी कमाई खर्या शाहरुख खानासदेखील पदार्पणात झाली नसेल अशी गंमतीदार प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटली. लिलावामध्ये चर्चेत आलेले आणखी एक नाव होते अर्जुन तेंडुलकरचे. 20 लाख रुपये एवढे किमान आधारभूत मूल्य असलेल्या अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने त्याच किमतीत उचलले. अन्य कुठल्या संघांनी त्याच्यासाठी बोलीदेखील लावली नाही, परंतु मुंबई इंडियन्स संघाचा मेन्टॉर असलेल्या सचिन तेंडुलकरला आपल्या मुलाचा समावेश आपल्याच संघात झाल्याचा विशेष आनंद झाला असेल. याआधी सराव गोलंदाज म्हणून अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या संघात पुरेशी सेवा बजावली आहे. रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, अजिंक्य राहणे असे नामवंत क्रिकेट सितारे आपल्याला मैदानात दिसणारच आहेत. आयपीएलच्या उत्सवात या नामवंतांचे वलय महत्त्वाचे असते. कारण जाहिरातींचा महसूल, प्रेक्षकांसाठी आकर्षण आणि प्रायोजकांना आमिष या बाबी नामवंत क्रिकेटपटूंवरच अवलंबून असतात. हा क्रिकेटचा एक प्रकारे बाजारच असला तरी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहायला हवे.