नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : आदईतील पियूष म्युझिक क्लासच्या वतीने एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध गायिका पद्मजा जोशी यांच्या शिष्यगणांचे गायन झाले.
नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. चंद्रकांत व छाया जोशी या उभयतांच्या हस्ते या संगीत वार्षिकोत्सवाचे उद्घाटन झाले.
पियूष संगीत क्लासच्या या संगीत वार्षिकोत्सवामध्ये पद्मजा जोशी यांच्या 25 कलाकारांनी मराठी, हिंदी गाणी सादर केली. यामध्ये लहान मुलांनी विविध भक्तिगीते व भावगीतांचे भावपूर्ण सादरीकरण करून रसिक पनवेलकरांची मने जिंकली. चार वर्षांच्या मुलांनी केलेले सादरीकरण रसिकांच्या मनाला भावणारे होते. अनघा भिडे यांंनी सिंथेसायजर आणि अमोल खासनीस व प्रतीक जोशी यांनी कलाकारांना तबलासाथ केली. सुषमा गोखले यांनी बहारदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
मुलांना सभाधारिष्ट्य व प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ मिळण्याची गरज आहे. ही मुले संगीत क्षेत्रात पनवेलचे नाव उंचावतील असा विश्वास वाटतो. – पद्मजा जोशी, संगीत शिक्षिका