पोलादपूर वनविभागाची कारवाई
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वनविभागाने शुक्रवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर खैराचे सोलीव ओंडक्यांची तस्करी करणारा एक ट्रक सुमारे पावणेबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलादपूर वनविभागाने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या गुप्त बातमीवरून वन परिमंडल अधिकारी श्याम गुजर, दिलीप जंगम आणि मच्छिंद्र देवरे, पोलादपूर तपासणी नाक्यावरील वनरक्षक नवनाथ मेटकरी, निलेश वाघमारे, निलेश नाईकवाडे, फिरते पथक स्टाफ वनपाल, रोहा येथील फिरते पथकाचे आर. जी. पाटील, वनरक्षक अजिंक्य कदम यांनी विनापरवाना खैर सोलीव ओंडक्यांची वाहतूक करणारा आयशर 1110 ट्रक (वाहन क्र. जीजे 15 एटी 4704) अडवून वनउपज तपासणी नाका येथे खैर तस्करीचा पहाटेच्या सुमारास पर्दाफाश केला.
या वेळी आरोपी वाहन चालक हादिस खान (रा.तलासरी) आणि मालक अब्बास खान (रा.भीलाड, गुजरात) यांनी या वाहनामध्ये खैर सोलीव नग 14.112 घनमीटर आकाराचे व किंमत एक लाख 71 हजार 114 रूपये आणि आयशर वाहन किंमत 10 लाख रुपये असे एकूण एकंदर 11 लाख 71 हजार 114 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतीय वन अधिनियनानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वनपरीमंडल अधिकारी पोलादपूर व स्टाफ करीत आहेत.