Breaking News

राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये -केशव उपाध्ये

मुंबई : प्रतिनिधी

आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहचणार आहे, याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणार्‍या काँग्रेसने राम मंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे लगावला आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राम मंदिर निधी संकलन करणार्‍या कार्यकर्त्यांवर शंका घेत हा निधी योग्य ठिकाणीच जाईल, याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, असे एक पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपाध्ये यांनी म्हटले आहे की, राम मंदिरासाठी सामान्य माणूस स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसच्या मंडळींचा पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही, याची चिंता काँग्रेस पक्षाला वाटू लागली आहे.

राम मंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरीत निधी देणार्‍याकडे सुपूर्त करीत आहेत. निधी संकलन करणार्‍या संघटनांवर विश्वास असल्याने गोरगरिबही निधी संकलनास हातभार लावत आहेत, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहे, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राम मंदिराचा निधी नॅशनल हेराल्ड प्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे, असेही उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply