Breaking News

एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुनरूच्चार

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कष्ट घेत आहेत आणि लोकहितासाठी काम करणार्‍या भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवांचे पीक निर्माण होत असते. त्या अनुषंगाने काही वृत्तवाहिन्यांवर भाजपचे आमदार घरवापसी करणार असे वृत्त प्रसारित केले जात आहे. त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी भूमिका स्पष्ट करून सर्व वावड्यांना पूर्णविराम दिला आहे.

अफवांवर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, मी भाजपचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे, तसेच पक्षाने माझ्यावर प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या सिडको महामंडळाची जबाबदारी दिली. माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली. रायगड जिल्ह्यात मी, पेणमधून रविशेठ पाटील अधिकृतरीत्या, तर अपक्ष म्हणून महेश बालदी निवडून आले आहोत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे आम्ही तीन आमदार आहोत. भाजप जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करून पाळेमुळे घट्ट करीत असून, भाजपचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात पक्ष अधिकाधिक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

नव्याने निर्माण झालेल्या सरकारमध्ये जाण्यासंदर्भात ज्यांची नावे आता वृत्तवाहिनीवर चालवली जात आहेत, त्या सर्व आमदारांना मी व्यक्तीशः ओळखतो. ते दुसर्‍या पक्षात जाण्याची चूक करणार नाहीत, असा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अभिमानास्पद निर्णय घेतले आहेत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी भरारी घेतली आहे आणि या पक्षातील मी कार्यकर्ता आहे. नवे सरकार स्थापन झाले म्हणून त्या सरकारमध्ये जावे असे माझे मत नाही, ती फक्त अफवा आहे. काहीही झाले तरी मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहिन. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा संदर्भ कुणी जोडू नये, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेवटी म्हटले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply