नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नव्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि. 1) अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021-22च्या बजेटकडे सगळ्यांचे लक्ष आहे. याचबरोबर रेल्वे बजेटही सभागृहात मांडले जाईल. यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा ठरणार आहे. याआधी अर्थमंत्री ब्रिफकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन जात. यंदा पेपरलेस बजेट सादर केले जाणार असून, त्यासाठी अॅप लाँच करण्यात आले आहे. या युनियन बजेट मोबाइल अॅपमध्ये आर्थिक ताळेबंद, अनुदानविषयक मागण्या, वित्त विधेयक आणि इतर दस्तावेज बघता येतील. हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अर्थसंकल्प व अन्य दस्तावेज वाचण्याची तसेच डाऊनलोड करण्याचीही सोय आहे. हे अॅप अर्थसंकल्पाचे संकेतस्थळ (www.indiabudget.gov.in) यावरूनही डाऊनलोड करता येईल, तर अर्थमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर अॅपवर दस्तावेज मिळतील. इंग्रजांच्या काळात मार्चअखेर अर्थसंकल्प सादर व्हायचा आणि 26 फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा स्वतंत्र भारतातही सुरू होती. मोदी सरकारने रेल्वे अर्थसंकल्प हा मुख्य अर्थसंकल्पाचा भाग बनविला. त्यामुळे संसदेचा वेळ आणि स्वतंत्र अधिवेशन बोलाविण्यावर होणारा अफाट खर्चही वाचला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यातील सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल. पुन्हा 8 मार्चपासून संसदेचे सत्र सुरू होईल आणि 8 एप्रिलला अधिवेशन संस्थगित होणार आहे.