जैन मुनी विजय महाराज यांचे खोपोलीत आवाहन
खोपोली : प्रतिनिधी
समाजात वाढलेला व्यभिचार, लुटारु प्रवृत्ती, वाईट मार्गाने संपत्ती कमविण्याचा मोह या सर्व बाबी नष्ट करायच्या असतील तर, मर्यादा पुरुषोत्तम, संयमी व दुसर्याबद्दल आदर असणार्या प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणे काळाची गरज आहे, याकरीता प्रत्येक भारतीयाने यथा शक्ती निधी दिला पाहिजे, असे प्रतिपादन जैन मुनी विजय महाराज यांनी खोपोली येथे केले.
श्रीराम जन्मभूमी न्यास खालापूर तालुका व खोपोली शहर यांच्या वतीने विजय महाराज यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन खोपोलीतील लोहाणा समाज हॉलच्या प्रांगणात करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. ज्या ठिकाणी गेल्यानंतर मन शुद्ध होते, मनाला शांती लाभते, मनातील अविचार जातात, ती जागा म्हणजेच मंदिर, असे विजय महाराज यांनी या वेळी सांगितले.
प्रत्येक कुटुंबातील कर्त्यापुरुषाने आपल्या घरातील सदस्यांना वेळ दिलाच पाहिजे, त्याने त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. सध्या मोबाइल संस्कृतीमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत, ते टाळण्यासाठी मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे. आपल्या धर्माची ओळख व्हावी यासाठी त्यांना लहानपणीच मंदिरात नेण्याची सवय लावा, त्यांना आपोआप आपल्या संस्कृतीची ओळख होईल, असे विजय महाराज यांनी सांगितले.
जैन मुनी विजय महाराजांनी सुमारे अडीच तासाच्या व्याख्यानातून नास्तिक असणार्यांवर ताशेरे ओढले. या वेळी मंदिर निर्माणासाठी महाराजांनी आवाहन केले व त्यास उपस्थितातून चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेळी श्री राम मंदिर निर्माणासाठी मान्यवरांनी देणग्या दिल्या. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश महाराजांच्या उपस्थितीत समितीकडे दिला.