पनवेल : रामप्रहर वृत्त
दिशा महिला मंचच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे शनिवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. ’ती’च्या नजरेतून हा उपक्रम या वेळी राबविण्यात आला. कामोठे येथील नालंदा बुद्धविहार येथे झालेल्या या समारंभात उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी कुंकवाची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी बचत गट व्यवसायावर मार्गदर्शन केले. आयुर्वेदाचार्य डॉ. नितीन थोरात यांनी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केस व केसांचे विकार आणि आयुर्वेद चिकित्सा या विषयावर मार्गदर्शन केले, तर लेखक व गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण यांनी पैशाची बचत कशी करावी व त्याचे योग्य ठिकाणी व्यवस्थापन कसे करावे यावर महिलांना मार्गदर्शन केले.
विद्या मोहिते यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. खुशी सावर्डेकर यांनी उपस्थित मान्यवरांसह महिलांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाच्या अध्यक्ष निलम आंधळे, रेखा ठाकूर, भावना सरदेसाई, अनुप्रिता महाले, शिल्पा चौधरी, भक्ती शिंदे, योजना दिवटे, दीपाली खरात, रूपा जाधव, लीना सावंत, रुपाली होडगे परिश्रम घेतले.