कर्जत : बातमीदार
माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या ठेकेदाराकडील सफाई कामगारांनी थकीत मानधन मिळावे यासाठी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते. तब्बल नऊ दिवसांनी मागण्यांवर सन्मानजनक तोडगा निघाल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माथेरान नगरपालिकेच्या ठेकेदाराकडील सफाई कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषण मागे घेण्यासाठी नगर परिषदेने 28जानेवारी रोजी लेखी आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता होणार नाही, तोवर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. नगर परिषदेने मंगळवारी(दि. 2) ठेकेदाराच्या ठेक्यामधील अनामत रकमेतून कामगारांची मानधनाची थकीत रक्कम कामगारांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यां कामगारांनी उपोषण स्थगित केले. या वेळी कर्जतचे नगरसेवक राहुल डाळींबकर, ठाकूर कातकरी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडा, जैतू पारधी, भाजपचे विलास पाटील, व्यापारी फेडरेशनचे राजेश चौधरी तसेच मनोज खेडकर, अजय सावंत, चंद्रकांत चौधरी, संतोष कदम, शफीक बढाणे, अनिल गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, महसूल अधीक्षक बापूराव भोई आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते.