राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून, त्यामध्ये देशातील 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, 28,589 लोकसंख्येपैकी 21.4 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 19.1 टक्क्यांच्या तुलनेत शहरी झोपडपट्टीतील 31.7 टक्के लोकसंख्या आणि 26.2 टक्के इतर लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे.
60 वर्षांवरील 23.4 टक्के लोकांना, तर 7,177 आरोग्य कर्मचार्यांपैकी 25.7 टक्के जणांना कोरोना होऊन गेला आहे. येत्या काळात अजूनही मोठ्या लोकसंख्येवर हा धोका कायम असल्याचे हा अहवाल सांगतोय.
दरम्यान, देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आलेय की भारतात कोरोनाचा क्युमुलेटिव्ह पॉझिटिव्ह दर हा 5.42 टक्के आहे. त्यामध्ये सातत्याने घसरण सुरू आह. गेल्या आठवड्यात हा दर केवळ 1.82 टक्के इतका होता. गेल्या तीन आठवड्यांत देशातील 47 जिल्ह्यांत कोरोनाची कोणतीही केस समोर आली नाही, तर 251 जिल्ह्यांमध्ये कोणताही बळी गेला नाही.
देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना ही लस देण्यात येत आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.