खोपोली ः बातमीदार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करून खाद्यपदार्थ विक्री करणारा हसमुख अशोक प्रजापती (27, रा. चौक, खालापूर) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे, तर अन्य एका घटनेत दारूविक्री करणार्या इसमाला खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीत गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा वाजता प्रजापती हा त्याच्या मालकीचे उज्जाला स्विटस नावाचे दुकान उघडे ठेवून खाद्यपदार्थ विकत होता. सपोनि. संजय बांगर यांना त्याबाबत माहिती प्राप्त होताच हसमुख प्रजापतीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भा. दं. वि. कलम 188, 270, राष्ट्रीय आपत्ती कायदा 2005चे कलम 51 ब साथरोग अधिनियम 1897चे कलम 3प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रसाद पाटील करीत आहेत. दुसर्या घटनेत ढेकू ता. खालापूर येथे राहणारा आरोपी देशी दारूची विक्री करताना सापडला. त्याच्याकड्ून 2132 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. स. कलम 188प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक एच. उघडा करीत आहेत.