खोपोली ः प्रतिनिधी
बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना शुक्रवारी रात्री खोपोलीजवळ घडली. हत्या करून मुलीचा बाप बिहारमध्ये पळून गेला होता, मात्र खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग आणि पथकाने बिहारमध्ये जाऊन शनिवारी रात्री आरोपी बापास ताब्यात घेतले आहे.
बिहार येथील एक कुटुंब 2 फेब्रुवारीला सकाळी खोपोलीतील एका लॉजवर उतरले होते. 5 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता या कुटुंबाने अचानक लॉज सोडला. कुटुंबप्रमुख अजय सुदर्शन सिंग (48), पत्नी सुमनदेवी अजय सिंग (34) व मुलगी खुशी अजय सिंग (14) यांचा कुटुंबात समावेश होता. लॉज सोडल्यावर अजय सिंगने सर्वांना अज्ञातस्थळी नेऊन पत्नी आणि मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी अजयने खुशीचा गळा कापून तिची हत्या केली व धड झुडपात ठेवून कापलेला गळा व शीर जवळच असलेल्या पाताळगंगा नदीत टाकून दिले. हे सर्व त्याची पत्नी सुमन व दुसर्या मुलीने बघितले. त्यांनी अजयच्या ताब्यातून सुटून स्थानिकांच्या मदतीने सर्व माहिती खोपोलीपोलिसांना दिली.
त्यानंतर खोपोली पोलिसांनी तातडीने पोलीस पथक पाठवून तपासकार्य सुरू केले. यादरम्यान आरोपी अजय सिंग बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्याच्या मोबाइल लोकेशननुसार तो बिहारमध्ये गेल्याचे आढळले. त्यानुसार खोपोली पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पथक तातडीने बिहारकडे रवाना झाले. त्यांनी शनिवारी रात्री आरोपी अजयला कुद्रा जिल्हा भवुआ बिहार येथील रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले.
रेल्वे पोलीस व बिहार पोलिसांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच खोपोली पोलीस पथक आरोपीला घेऊन खोपोलीत दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा अगोदर खोपोली व हद्दीनुसार नंतर खालापूर पोलीस स्टेशनकडे दाखल झाला आहे. हत्या झालेल्या तरुणीचे धड पोलिसांना मिळाले असून नदीत टाकलेल्या तरुणीच्या शिराचा तपास खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखाली अद्यापही सुरू आहे.
मुलीचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून वडिलांनी मुलीचे मुंडके छाटून निर्घृणपणे तिची हत्या केली होती. या घटनेच्या साक्षीदार असलेल्या आई व बहीण या दोघींना मानसिक धक्का बसला होता, तर या घटनेमुळे खालापूर तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी शिताफीने आरोपीला अटक केली.