कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आषाणे गावातील विजेच्या अनेक समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरण विभागाकडे लेखी निवेदन दिले आहे. गावाला वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र कोसळण्याच्या स्थितीत असून गावातील निम्म्याहून अर्धे विजेचे लोखंडी खांब गंजले आहेत. याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश देवके यांची भेट घेऊन वीज समस्या सोडविण्याची मागणी केली.
या वेळी मनसेचे आषाणे शाखा अध्यक्ष आशिष ठाणगे, उपशाखा अध्यक्ष रोहन जाधव, पक्षाचे उमरोली उपविभाग अध्यक्ष मनोज ठाणगे तसेच शाखेचे पदाधिकारी प्रशांत ठाणगे, कृष्णा ठाणगे, मनसेचे उमरोली शाखा अध्यक्ष पंकज बुंधाटे आदी उपस्थित होते.
आषाणे गावात 1990च्या दशकात विजेचे खांब उभे केले होते. 100हून अधिक घरांची वस्ती असलेल्या गावात वीजपुरवठा करण्यासाठी बसवलेले वीज रोहित्र कधीही कोसळून मोठा स्फोट होण्याची स्थिती आहे. वीज रोहित्रामधून वार्याची झुळूक आल्यास स्पार्किंग होऊन आगीचे लोळ जमिनीवर पडतात. वीज रोहित्राच्या ठिकाणी लोकवस्ती असल्याने लहान मुलांनाही धोका निर्माण झाला आहे. गावात बसविलेले विजेचे लोखंडी खांब गंजले आहेत. विजेच्या तारा एकमेकांना चिकटून अनेक वेळा वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडतात.