पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकुण 790 जणांनी कोविड 19ची लस घेतली असून त्यामध्ये महापालिकेच्या अधिकार्यांचा ही समावेश असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. राज्यात सुरू झालेल्या कोविड 19 लसीकरणाचा दुसरा टप्पा सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात चालू आहे. या लसीकरणाअंतर्गत फ्रंट लाईन वर्कर्स ज्यामध्ये सुरक्षा विभागातील कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना लसीकरण केले जात आहे. पालिकेच्या वतीने सध्या एमजीएम वैद्यकिय महाविद्यालय, येरळा वैद्यकिय महाविद्यालय, टाटा मेमोरिअल सेंटर, लाइफलाइन रुग्णालय, पोलारिस रुग्णालय, सुअस्थ रुग्णालय याठिकाणी लसीकरण चालू आहे. आरोग्य विभागाला सध्या 2168 इतके लक्ष दिले असून गुरुवार (दि. 11) पर्यंत महापालिका क्षेत्रात एकुण 790 जणांनी कोविड 19ची लस घेतली होती. यात सुअस्थ रुग्णालयात महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, मुख्यलेखापरिक्षक विठ्ठल सुडे, उप अभियंता विलास चव्हाण यांनी कोविड 19 ची लस घेतली.