Breaking News

चेन्नईतील पराभवाची चेन्नईतच परतफेड!

टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

चेन्नई : वृत्तसंस्था

येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पदार्पणवीर अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या भेदक मार्‍यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ 164 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय संघाने दुसरा सामना 313 धावांनी जिंकला. या विजयासाह भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

विस्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची शतकी खेळी, आर. अश्विनची अष्टपैलू कामगिरी आणि पदार्पणवीर अक्षर पटेल याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसर्‍या कसोटी सामन्यात निर्वादित वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात रोहित शर्माच्या 161 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने 329 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विन याने पाच बळी घेतले, तर दुसर्‍या डावात तीन बळी मिळवत सामन्यात एकूण आठ बळी मिळवले आहेत. याशिवाय दुसर्‍या डावात फलंदाजी करताना अश्विन याने शतकी खेळी केली होती.

पदार्पणवीर अक्षर पटेल याने दुसर्‍या डावात अचूक टप्यावर मारा करीत पाच बळी घेण्याची किमया साधली. पटेलने पहिल्या डावात दोन आणि दुसर्‍या डावात पाच बळी घेत सामन्यात एकूण सात बळी मिळवले आहेत. कुलदीप यादव याने दोन गडी बाद केले.

दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.  पहिल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणार्‍या इंग्लंडच्या कर्णधारा दुसर्‍या सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव-सर्वबाद 329 (रोहित शर्मा  161, मोईन अली 128/4) इंग्लंड पहिला डाव-134 (बेन फोक्स 42, अश्विन 43/5) भारत दुसरा डाव-सर्वबाद 286 (आर. अश्विन 106, मोईन अली 98/4) इंग्लंड दुसरा डाव-164 (मोईन अली 43, अक्षर पटेल 60/5).

धोनीच्या विक्रमाशी विराटची बरोबरी

या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटने घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून 21 कसोटी विजय मिळवले. धोनीनेदेखील आपल्या कारकिर्दीत मायदेशात 21 कसोटी विजय मिळवले होते. त्या पराक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply