अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. इमारतीच्या आंतररुग्ण विभागातील छताचा स्लॅब पुन्हा कोसळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. त्यामुळे चाळीस वर्षे जुन्या झालेल्या या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जिल्हा रुग्णालयाची इमारत 1980-81 मध्ये बांधण्यात आली आहे. या दोन मजली इमारतीत सध्या अपघात विभाग, क्ष किरण विभाग, सोनोग्राफी, डायलेसिस विभाग, स्त्री आणि पुरूष सर्जिकल वॉर्ड, शस्त्रक्रीया विभाग, अतिदक्षता विभाग, औषध भंडार, कोविड व़ॉर्ड आणि जळीत विभाग, नवाजात बालक संगोपन विभाग, तसेच टेलिमेडीसीन कक्ष कार्यान्वीत आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि विभाग लक्षात घेतले तर इमारत आता अपुरी पडायला लागली आहे. इमारतीच्या बांधकामाला 40 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण आणि धोकादायक बनत चालली आहे. इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ वर्षात या इमारतीवर तब्बल 12कोटी रुपये येवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र इमारतीची परिस्थिती काही सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी इमारतीला गळती लागली असून इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहे. काही ठिकाणी टेकू लावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे. सन 2012मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यावेळी इमारत धोकादायक झाली असून व्यापक दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडीट करणार्या संस्थेने दिला होता. तर आरोग्य विभागाने जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. बांधकाम विभागाने आरोग्य विभागाच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून जुन्याच इमारतीच्या दुरुस्तीवर भर दिला. मात्र दुरुस्तीनंतरही इमारतीची परिस्थिती फारशी सुधारली नाही. आता ही इमारत पुन्हा एकदा धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे.
जिल्हा रुग्णालय आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची या संदर्भात बैठक घेतली. बांधकाम विभागाला इमारतीची पहाणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देशही दिले आहेत.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड