Breaking News

पोलादपुरातील आरोग्य यंत्रणेच्या बळींचा मुद्दा विधान परिषदेत

पोलादपूर शहरातील सैनिक नगरामधील माता मृत्यूप्रश्नी भाजपाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून जोरदार रणक्रंदन केले. आता काळवली गावातील शाळकरी मुलांचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी विधीमंडळाच्या आगामी अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. पोलादपूर तालुक्यातील दोन आरोग्य बळींसंदर्भात  आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार जयंत पाटील आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी करतील आणि आरोग्य बळींच्या हानीची भरपाईदेखील संबंधितांना मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.

पोलादपूर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांची चिठ्ठी घेऊन माणगांव उपजिल्हा रूग्णालयामधील डॉ. घोंगडे यांनी सोनल संकेत लाड हिला 29 नोव्हेंबर 2019ला सिझेरियनसाठी दाखल करून घेतले. तेथे तीन बाळंतिणींची सिझेरियन शस्त्रक्रिया करून झाल्यानंतर डॉ. घोंगडे यांनी सोनल हिची सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू केली. याचवेळी अन्य वॉर्डामध्ये इमर्जन्सी पेशंट आल्याने डॉ. घोंगडे हे सुमारे दहा-पंधरा मिनिटांनंतर ऑपरेशन रूममधून बाहेर येऊन इमर्जन्सी पेशंट पाहण्यासाठी गेले. यानंतर डॉ. घोंगडे हे पुन्हा सोनल हिच्या सिझेरियनसाठी गेले आणि त्यांनी पंधरा मिनिटांमध्ये बाहेर येऊन नातेवाईकांना मुलगा झाल्याचे सांगितले आणि तेथील नर्सनी एक बाळ संकेत त्याच्या आईकडे दिले. या वेळी सोनल हिची कुटूंब नियोजनाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र,  सोनल हिची पती व सासूसोबत भेट होऊ दिली नाही. सोनलला ऑपरेशन रूममधून एका बेडवर आणल्यानंतर रात्री तिने दोनवेळा बाळाला दूधही पाजले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिच्या वेदना तिला असह्य होऊ लागल्याने तिने पती संकेत आणि सासूला ही बाब सांगितली. डॉ. घोंगडे यांनी सोनल हिला तपासल्यानंतर लघवी अडकल्यामुळे मुंबईला जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल, असे सांगून सकाळी 10वाजण्याच्या सुमारास एक खासगी  अ‍ॅम्ब्युलन्स करून दिली. या वेळी सोनल हिच्या सासुला अ‍ॅम्ब्युलन्समधून नेण्याचे टाळले गेले. कोलाड फाट्याजवळ ही खासगी अ‍ॅम्ब्युलन्स बदलून 108 अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आली. या वेळी स्ट्रेचरवरून सोनल हिला त्या 108 अ‍ॅम्ब्युलन्समध्ये हलविण्यात आले. या दरम्यान, सोनल हिच्या नाका-तोंडातून तसेच सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर घातलेल्या टाक्यांतून रक्तस्त्राव सुरू झाला. यापुढे पुन्हा पनवेल येथे ही 108 अ‍ॅम्ब्युलन्स बदलून दुसरी 108 अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आली. पुन्हा सोनल हिला स्ट्रेचरवरून त्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आले. संध्याकाळी 5वाजण्याच्या सुमारास ही 108 अ‍ॅम्ब्युलन्स मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये पोहोचली. यावेळी प्रथम सोनल हिला अपघात विभागात नेण्यात आले. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अत्यवस्थ अवस्थेत पोहोचलेल्या सोनल हिला सायंकाळी 5वाजेपर्यंत तीन अ‍ॅम्ब्युलन्स बदलून 14तासांनंतर जे. जे. हॉस्पिटलपर्यंत पोहोचताना झालेला रक्तस्त्राव खुपच जास्त होता. तेथे डॉक्टरांनी सोनल हिच्या सिझेरियन ऑपरेशननंतर घातलेले टाके दाबून पोटात झालेले रक्त बाहेर काढले. अनंतवेदना सोसत सोनलचा मृत्यू झाला.

या सर्व घटनाक्रमांमध्ये सरकारी आरोग्य यंत्रणा सुसज्ज नसणे, ही सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरली आहे. तसेच या आरोग्य यंत्रणेमध्ये झारीचे शुक्राचार्य बसलेले दिसून येत आहेत. त्यांचे उच्चाटनही करण्याची गरज आहे. पुन्हा कोणी गरीबाघरची सुनबाई अशी बाळंतपणादरम्यान मृत्यूमुखी पडू नये अथवा पुन्हा कोणी गरीबाची मुलं आईविना पोरकी होऊ नयेत, ही अपेक्षा असताना केवळ विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला. आमदार प्रवीण दरेकर यांनी ही माता मृत्यूची घटना सभागृहासमोर मांडून रायगड जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेची दयनीय अवस्था कथन केली. सरकारी आरोग्य यंत्रणाच सोनल लाड हिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करीत सोनाली हिच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. मात्र, कोरोना लॉकडाऊन काळात याप्रकरणी कार्यवाही झाली नाही.

पोलादपूर तालुक्यातील काळवली येथील प्रतिक प्रमोद महाडिक हा 14 वर्षीय शाळकरी मुलगा घरामध्ये झोपला असता 09 सप्टेंबर 2020 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याला मण्यार या विषारी सर्पाने दंश केला. यानंतर तातडीने त्याच्या पालकांनी व नातेवाईकांनी त्याला पोलादपूर येथे ग्रामीण रूग्णालयामध्ये सव्वा एक वाजता उपचारासाठी आणले. मात्र, येथे डॉक्टर आणि योग्य उपचारसुविधा उपलब्ध नसल्याने प्रतिक याला महाड ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना पहाटेच्या सुमारास प्रतिक याचा 09 सप्टेंबर 2020 रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी आता  आमदार जयंत पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणात  सरकारी यंत्रणांनी कागदपत्रे रंगवून सोयीस्कररित्या सुटकेचे प्रयत्न चालविले आहेत. आरोग्य यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही बळींच्या कुटूंबियांना भरपाई देण्यासंदर्भात सरकारी अनास्था दिसून येत आहे. याखेरीज, आरोग्य बळींना हकनाक प्राण गमवावे लागण्याच्या परिस्थितीला जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचा व्यापक प्रयत्न सुरू असल्याने या प्रकरणी पोलादपूर तालुक्यात सुप्त ज्वालामुखी सदृश्य जनक्षोभ नांदत असल्याकडे सरकारी यंत्रणेचे सपशेल दूर्लक्ष होत आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply