Breaking News

हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारक परिसर समाजासाठी वापरण्यासाठी द्यावा; स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेची मागणी

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक परिसराचा वापर समाजाच्या उपयोगासाठी करावा, अशी मागणी बुधवारी (दि. 17) स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेऊन व निवेदन देऊन करण्यात आली. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारक हे पनवेलची एक ऐतिहासिक ओळख आहे. महापालिकेने या वास्तूचा उपयोग स्मारकामध्ये छोटी प्रदर्शन भरवणे (बेलापूर येथील अर्बन हट)प्रमाणे, बचत गट, आदिवासी वस्तू विकी यांसाठी स्मारकाची बाहेरील जागा अल्पदरात भाड्याने देणे, प्रवचने, साहित्य, कवी संमेलने, बौद्धिक, छोट्या मुलांचे चित्रकला, हस्तकला, गाणी, नृत्य यासाठी संस्थांना अल्प दरात भाड्याने देणे, छोटे कार्यकम जसे हळदी-कुंकू, भोंडला, सांस्कृतिक कार्यकम, वाढदिवस याकरिता महानगरपालिकेतर्फे भाड्याने देणे. इतर अनेक ही कल्पना पुढे येतील, पण पनवेल शहराच्या मध्यवर्ती असलेली ही वास्तू सर्वांसाठी उपयांगाची झाली पाहिजे. येथे आत व बाहेर रायगडमधील प्रसिध्द स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे, शिवराज्याभिषेक आदी चित्रे रंगवली पाहिजेत. पनवेल तालुक्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेली कोनशीला बसवली पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही आपणास नक्की मदत करू, स्वयंसेवकाचे काम करू व वास्तू जागती ठेवू. निवेदन देताना स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सुरेंद्र गोडबोले, बबन जगनाडे, श्याम वालावलकर,  यतीन ठाकूर उपस्थित होते.

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आश्वासन

निवेदनाची दखल घेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सकारात्मक दुजोरा देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे. आपण आपल्या स्तरावर या वास्तूचा कायापालट करून ती सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरती होईल अशा प्रकारचे नियोजन कराल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला, तसेच याबाबत लवकरच आयुक्तांसोबत भेट घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडू, असेही आश्वस्त केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply