पनवेल : वार्ताहर
मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासनाकडून बेटी बचावसारखे अभियान राबवले जात असूनदेखील मुलांच्या मानाने मुलींची संख्या घटत असून, पनवेल महानगरपालिका हद्दीतदेखील अशीच स्थिती आहे. पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे मागील वर्षभरात जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या करण्यात आलेल्या नोंदीतील आकड्यावरून हे स्पष्ट झाले आहे. जगभरात पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या घटत असल्याने मुलींची संख्या वाढवण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या प्रयत्नानंतरही मुलांच्या मानाने मुलींची संख्या घटतच आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतदेखील जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020पर्यंत करण्यात आलेल्या नोंदीनुसार वर्षभरात जन्माला आलेल्या नऊ हजार 612 नवजात बालकांमध्ये मुलांची संख्या चार हजार 979 इतकी असून मुलींची संख्या चार हजार 633 इतकी म्हणजेच पुरुषांच्या मानाने जवळपास चार टक्के कमी आहे. पनवेल महापालिकेतील चार प्रभागात जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये करण्यात आलेल्या नोंदीनुसार नावडे विभागात वर्षभरात जनमलेल्या 54 नवजात बालकांमध्ये 29 मुले तर 25 मुली असून, पनवेल विभागात जन्माला आलेल्या तीन हजार 849 नवजात बालकांमध्ये एक हजार 992 मुले, तर एक हजार 857 मुली, खारघर विभाग 652 मुले, तर 637 मुली, ओवे विभाग 64 मुले, तर 72 मुली, कामोठे विभाग 511 मुले, तर 434 मुली, कळंबोली विभाग एक हजार 731 मुले, तर एक हजार 608 मुली अशा एकूण नऊ हजार 612 बालकांचा जन्म झाला आहे.