विरोधक आक्रमक, विविध मुद्दे गाजणार!
मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (दि. 14)पासून सुरू होत असून, ते अवघ्या दोन दिवसांचे असणार आहे. तरीही या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असल्याचे पहावयास मिळत आहेत. कोरोनाचे कारण पुढे करून अधिवेशन दोनच दिवस आयोजित केल्याने विरोधकांनी सरकारी चहापानावर बहिष्कार घालून पुढील संकेत दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात येत आहे. पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरिता हे दोन दिवसीय अधिवेशन होत असले तरी विरोधी पक्ष भाजप सरकारला घेरण्याची संधी सोडणार नाही. मराठा आरक्षणाचा विषय सध्या गाजत आहे. हा मुद्दा विरोधक उपस्थित करणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कृषी कायद्यांचा मुद्दा उचण्याची शक्यता आहे, पण काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच यापूर्वी कृषी धोरणांना कसा पाठिंबा दिला होता याकडे भाजपचे नेते लक्ष वेधतील. मोफत वीज आणि वाढीव वीज बिलांचा मुद्दाही विरोधकांकडून मांडण्यात येणार आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना जाहीर झालेली मदत अद्याप काही जणांना मिळाली नाही. यावरही अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. एकंदर भाजप विरुद्ध महाआघाडी सरकार असा सामना रंगेल.