
रोहे ः प्रतिनिधी
रोहा शहरात वाहतूक कोंडी होऊ नये व शहरातील बेशिस्तपणा जावा यासाठी रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या वतीने रोहा बाजारपेठेतील हातगाडी व्यावसायिक, फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर जागा मोकळी झाली होती. आता या ठिकाणी बाजारहाटासाठी आलेले नागरिक चारचाकी गाड्या उभ्या करीत असल्याने बाजारपेठेतील मोकळी जागा चारचाकी वाहनांनी व्यापली आहे. परिणामी रोहा शहरातील बाजारपेठेत रस्त्यावर पार्किंग झोन झाल्याचे दिसून येत आहे.
रोहा शहरात विविध बदल होत असताना बाजारपेठेतही बदल करण्यात आले. नगर परिषदेच्या वतीने रोहा बाजारपेठेतील हातगाडी व्यावसायिक, फळविक्रेते तसेच भाजी विक्रेत्यांना नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे रोहा बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता, परंतु आता या मोकळ्या जागेत दुचाकी व चारचाकी वाहने उभी होत असल्याने पुन्हा एकदा बाजारपेठेतील रस्त्यावर पार्किंग झोन झाल्याचे दिसून आले. नगर परिषदेच्या वतीने बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र नागरिक मोकळ्या जागेत बिनधास्तपणे वाहने उभी करून खरेदी करतात. त्यामुळे फिरोज टॉकीज ते मिराज हॉटेलसमोर, रोहा नगर परिषदेसमोरील चौकात, रोहा एसटी स्टँड, तीन बत्ती नाका, राम मारुती चौक, सावरकर रोड, एसटी स्टँड बायपास, स्मशानभूमी रोड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यात येत आहेत.