Breaking News

राज्यस्तरीय शिवगान 2021 स्पर्धा ; रायगडने पटकाविला विजेतेपदाचा किताब

पनवेल ः प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिवगान 2021 स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याने सांघिक स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकाविला, तसेच प्राथमिक फेरीच्या उत्कृष्ट नियोजनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही पटकावून उत्तर रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
 सामगंध कला केंद्र पनवेल यांनी सांघिक गटात सातारा येथे झालेल्या अंतिम फेरीत उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले. या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले, सांस्कृतिक सेलचे प्रदेश अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी आदी मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रदेश सदस्य सुनील सिन्हा, कोकण संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दीपक पवार आदी उपस्थित होते. सांघिक प्रथम पारितोषिक सामगंध कला केंद्राच्या टीमने, तर उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, पनवेल सहसंयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी यांनी स्वीकारला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी गीतांचा समावेश असलेल्या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश भाजप सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याकडून चमकदार कामगिरी व्हावी यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरी पार पडली होती.
त्यातून सांघिक गीतगायन स्पर्धेत सामगंध कला केंद्र पनवेलने प्रथम क्रमांक पटकाविला होता. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सामगंध कला केंद्र पनवेलने सांघिक गटातून उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले.  उत्तम सादरीकरण करून रायगडच्या संघाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
उत्तम स्पर्धा नियोजनाचे पाहिले पारितोषिक
राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्राथमिक फेरीसाठी बक्षिसे तसेच उत्तम नियोजन केले होते. त्यामुळे प्राथमिक फेरीच्या उत्तम नियोजनाबद्दलचे प्रथम क्रमांकाचे बक्षीसही उत्तर रायगड जिल्ह्याने पटकाविले.

भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर तसेच कोकण संयोजक राहुल वैद्य यांनी आम्हाला स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याने चमकदार कामगिरी केली. त्यांचे तसेच उत्तर रायगड व पनवेल सांस्कृतिक सेलच्या सर्व पदाधिकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
-अभिषेक पटवर्धन, संयोजक, उत्तर रायगड जिल्हा, सांस्कृतिक सेल

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply