पनवेल : रामप्रहर वृत्त
रॉयल टायगर्स असोसिएशनचा शिवजयंती सोहळा तरुणाईच्या जल्लोषात नवीन पनवेल, अदई सर्कल येथे झाला. संस्थेचे अध्यक्ष राहुल लोहकरे, सचिव अण्णासाहेब आहेर, खजिनदार नेत्रा यांच्यासह इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.
कुलगुरू हेल्थचे संस्थापक संजय लिला बाळकृष्ण यांनी या वेळी तरुणाईला मार्गदर्शन केले. तसेच कोकण डायरीचे संपादक तसेच भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकारिणी प्रदेश सदस्य तथा नवी मुंबई प्रभारी सय्यद अकबर यांनी रॉयल टायगर्स असोसिएशनच्या तरूण कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात शिवराय या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बापुराव महाजन यांनीही हा उपक्रम राबविणार्या रॉयल टायगर्सच्या तरुणाईचे तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर सहभागी कलाकारांच्या कलेचे मुल्यमापन करत मोलाचा सल्लाही दिला.
चित्रकला स्पर्धा निकाल
या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सत्यजित कडु यांना मिळाला. त्यांना पत्रकार सय्यद अकबर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नम्रता गोंधळी यांना चित्रकार बापुराव महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय क्रमांक सिद्धी म्हसकर यांनी तर अमृता तसे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. संस्था सचिव अण्णासाहेब आहेर आणि खजिनदार रत्ना यांच्या हस्ते अनुक्रमे देण्यात आले.
किल्ले बेलापूर येथे शिवजयंती उत्सव
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
युगनिर्माते प्रतिष्ठान व किल्ले बेलापूर कृती समितीच्या वतीने नवी मुंबईतील एकमेव किल्ला किल्ले बेलापूर येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. नवी मुंबईला लाभलेले भाग्य म्हणजे एकमेव किल्ला व ऐतिहासिक स्थळ किल्ले बेलापूर येथे शिवजयंती साजरी करण्याचे यंदाचे हे तृतीय वर्ष होते.
शिवजयंती उत्सव हा गडावर घेण्याचा मूळ उद्देश म्हणजे लोकांना किल्ला माहित होणे, हा होता. या शिवजयंती उत्सवाची सुरुवात किल्ल्यावर ज्योत प्रज्वलन करून करण्यात आली. त्याचसोबत शिवदिंडी पालखी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिवदिंडी पालखीच्या माध्यमातून शिवविचार लोकांमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, किल्ले बेलापूर कृती समिती या चळवळ तथा संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.