Breaking News

राज्य सरकार बलात्कार्‍यांना वाचवतेय

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

पुणे : प्रतिनिधी
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड, पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा दावणीला बांधली गेली आहे. बलात्कार्‍यांना वाचविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे, असा हल्लाबोल वाघ यांनी केला. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण राहात असलेल्या वानवडीतील घराची गुरुवारी (दि. 25) पाहणी केली. त्यानंतर त्या वानवडी पोलीस ठाण्यात पोहचल्या. या वेळी पोलिसांनी उद्धट उत्तर दिल्याचे वाघ यांनी सांगितले. ’अतिशय गंभीर आरोप असलेल्या मंत्र्याला वाचविण्यासाठी तिन्ही पक्ष आणि पोलीस एकत्र काम करीत आहेत. पोलिसांवर खूप मोठा दबाव आहे. त्यामुळेच पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून व्यवस्थित केला जात नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेण्यात यावा आणि त्याची जबाबदारी सक्षम आयपीएस अधिकार्‍याकडे देण्यात यावी, अशी मागणी वाघ यांनी या वेळी केली.
पूजाच्या मृत्यूनंतर सकाळी 7 ते 7.30च्या दरम्यान येथील लोकांनी 100 क्रमांकावर पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन करून घटनेची सगळी माहिती सांगितली होती. ते घटनास्थळावरचे प्रत्यक्षदर्शी होते. पोलिसांनी तो फोन कॉल जाहीर करावा, असे आव्हान वाघ यांनी दिले आहे. पोलिसांना एफआयआर दाखल करण्यासाठी कोणाचे आदेश हवे आहेत? घटनेच्या 17 दिवसांनंतरदेखील एफआयआर दाखल का केली जात नाही?’ असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
संजय राठोड स्वत:ला वाचवण्यासाठी समाजाचा वापर करीत आहेत. मुख्यमंत्री कोरोना पसरू नये असे आवाहन करीत असताना राठोड मात्र हजारोंची गर्दी जमवतात, पण काहीच कारवाई होत नाही. तेथे अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. यासाठी जबाबदार कोण, असा सवाल वाघ यांनी केला.
अशी घाण मंत्रिमंडळात नको!
शिवशाही केवळ भाषणात नको, कामातून दाखवा, असे आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केले. बाकी कोणाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण ते संवेदनशीलपणे आहेत. त्यामुळे त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा. अशी घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको, असे सांगून राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply