नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
राजे शिवराय प्रतिष्ठान, नवीन पनवेलच्या वतीने दिवाळीनिमित्त कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रविवारी (दि. 7) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमाणसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 16वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे.
पनवेल विभागाचे संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. किल्ला अभ्यास मोहिमेपासून ते किल्ला उभारणीपर्यंत पनवेल विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. किल्ले बांधकाम प्रमुख दीपक सावंत व अक्षय मिसाळ यांनी सर्वांना घेऊन सतत 15 दिवस काम करून किल्ला प्रतिकृती पूर्ण केली. दगड, माती, विटा वापरून हा किल्ला बनविण्यात आला आहे. अभ्यास मोहिमेदरम्यान किल्ल्याचा इतिहास समजून फोटोग्राफी करण्यात आली त्यानंतर किल्ल्याची मोजणी करून गुगलच्या साहाय्याने मॅप तयार करण्यात आला. जमिनीवर स्केल टाकूननंतर बांधणीला सुरुवात केली.
या प्रक्रियेदरम्यान मुलांना किल्ल्याचा इतिहास आणि त्याचे महत्व समजावले जाते याचबरोबर टीम बिल्डींग, टीम वर्क, कम्युनिकेशन स्किल, प्लॅनिंग या पद्धतीचे व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जातात. या प्रतिकृतीच्या दुर्ग दर्शन सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सहाय्यक सचिव ओमप्रकाश शेटे, आमदार प्रशांत ठाकूर तसेच राजेशिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे उपस्थित होते.
या सोहळ्याचे उत्सव प्रमुख सचिन माने तसेच कार्यक्रम प्रमुख मयूर निचित हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत भोसले यांनी केले, तसेच केतन गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानताना अटलजींच्या कविता बोलून सर्वांचे मन जिंकले. संपूर्ण आठवड्यात अनेक नागरिकांनी या प्रतिकृतीस भेट देत प्रतिष्ठानचे कौतुक करून ही परंपरा अशीच चालू राहावी, असे मत मांडले.रविवारी (दि. 7) या दुर्गदर्शन सोहळ्याचा शेवटचा दिवस होता. यादिवशी सायंकाळी दीपोत्सव साजरा करत या सोहळ्याची सांगता करण्यात आली.