Breaking News

राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पटोलेंच्या भूमिकेमुळे ‘मविआ’त खळबळ

मुंबई ः प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीसोबत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सारे काही आलबेल असल्याचा दावा तिन्ही पक्षांकडून केला जात असला तरी वेळोवेळी नेत्यांकडून केलेल्या विधानांमुळे त्यावर शंका उपस्थित करण्यासाठी मोठी जागा निर्माण होते.
शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर राज्यात भविष्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र दिसतील की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात विचारणा केली असता नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचे आमचे धोरण जाहीर केले आहे. समजा आम्ही सोबत आहोत, असे म्हटले आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असे सांगितले, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, या वेळी बोलताना नाना पटोले यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनाही सूचक इशारा दिला आहे. आम्ही आजपासूनच जाहीर करतोय की आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांनादेखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा, असे नाना पटोले म्हणाले. त्यामुळे आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यावर काँग्रेस ठाम असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी आगामी निवडणुका एकत्रच लढणार असल्याचे संकेत दिले होते. हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे काम करेल. नुसतेच काम करणार नाही, तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करून सामान्यांचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल याबाबत शंका नाही, असे शरद पवार म्हणाले होते, मात्र आता महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसकडून वारंवार स्वबळाचा नारा दिला जात असल्याने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply