अमरावती : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याची तयारी सुरू असताना अमरावतीमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून अमरावती शहर, अचलपूरमध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन आता 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे.
काही जणांंकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अंजनगाव सुर्जी शहरात कंटेमेन्ट झोन घोषित करण्यात आला आहे. आणखीन कडक निर्णय या आठ दिवसांची परिस्थिती पाहून घेणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेश दिले आहेत.
दुसरीकडे नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज आणि उद्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच आवाहन प्रशासनानं केले आहे. तसेच औरंगाबादबरोबरच आता जालना जिल्ह्यातही शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून, 31 मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.