नगरसेवक मनोज भुजबळ यांची भूमिका
पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील सिडको वसाहतीत सिडकोने बनवलेला रस्ता महावितरणाची लाईन आणि पाण्याची लाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी फोडून ठेवण्यात आला आहे. सदर काम पूर्ण होऊन महिना होऊन गेला तरी सिडकोने रस्ता पूर्ववत न केल्याने भाजपच्या ओबसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल करण्याचा इशार दिला आहे.
सिडकोच्या अधिकार्यांनी सिडको वसाहत करताना भविष्यात होणार्या पनवेल आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाचा वेध व्यवस्थित घेतला नाही. नवीन पनवेल बाजूला त्यावेळी जागा स्वस्त असल्याने अनेकांनी तेथे जागा घेतल्या. या भागात मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्याने नागरीकरण वाढले आहे. रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर वाहतूक वाढणार याचा अंदाज सिडकोला आला नाही. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी ठेवली आज तेथून नागरिकांना चालणे ही अवघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत गर्दी असते. त्यातच गेली 15 वर्षे खड्डे असलेल्या या रस्त्यांचे काम वर्ष अखेर करण्यात आले होते. पण हे समाधान फार काळ टिकले नाही.
सिडकोने सेक्टर 15, आणि 16 मध्ये पाइपलाइन, फुटपाथ आणि गटारांची कामे सुरू केली. पण ही कामे करताना रस्ता पूर्ण झाला की तो खणायचा असा उद्योग सुरू केला. त्यामुळे चांगल्या रस्त्यावरून चालण्याचे भाग्य महिनाभरही येथील नागरिकांना मिळालेले नाही. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता मेहबूब मुलाणी यांना विचारले असता आम्ही रस्ता केल्यानंतर पाणी पुरवठा विभागाला या भागात नवीन पाइपलाइन टाकणे अत्यावश्यक असल्याचे वाटल्याने त्यांनी आमच्याकडे रस्ता फोडण्याची परवानगी मागितली.
पाण्याचा प्रश्न असल्याने आम्ही परवानगी दिली हा रस्ता आम्ही पुन्हा व्यवस्थित करून घेऊ असे त्यांनी सांगितले होते. आज दोन महिने झाले तरी ते काम कोठेच सुरू असल्याचे दिसत नाही. त्यामुळे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.