खोपोली : प्रतिनिधी
गुजरात येथून कुटुंबासह अॅडलॅब इमॅजिका पार्कमध्ये मौजमजा करायला आलेल्या देवेंद्र जसुभाई गढवी (वय 23) या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 12) घडली. त्यामुळे या पार्कमधील हृदयात धडकी भरविणार्या राईड पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
गुजरातमधील नवसारी येथे राहणारे देवेंद्र गढवी त्याची पत्नी, मुलगा व नातेवाईकांसह खालापूर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क असलेल्या अॅडलॅब इमॅजिकात आले होते. पार्कमधील स्क्रिम मशिन आणि डिटू राईडची सैर केल्यानंतर देवेंद्र यांना अस्वस्थ वाटून ते चक्कर येऊन पडले. त्यांना नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पार्कमधील आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु गंभीर परिस्थितीमुळे त्यांना खोपोलीतील पार्वती रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टर्सनी तपासणी करून देवेंद्र मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती खालापूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.