Breaking News

भारतीय हॉकी संघाकडून जर्मनीचा धुव्वा

बर्लिन : वृत्तसंस्था
जवळपास 12 महिन्यांनंतर पहिला सामना खेळणार्‍या भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करीत यजमान जर्मनीचा 6-1 असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौर्‍याची शानदार सुरुवात केली.
निळकंठ शर्मा (13व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (27व्या आणि 28व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (41व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (42व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (47व्या मिनिटाला) यांनी गोल करीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत जर्मनीच्या बचावफळीवर दडपण आणले. सातत्याने चाली रचल्याने भारताला 13व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर निळकंठने गोल केला. मग पुढच्याच मिनिटाला कॉन्टन्टिन स्टेइबने जर्मनीला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
दुसर्‍या सत्रात विवेकने लागोपाठ दोन गोल करीत भारताला 3-1 असे आघाडीवर आणले. तिसर्‍या सत्रात जर्मनीने सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण पी. आर. श्रीजेशच्या भक्कम बचावासमोर त्यांना एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे ललित आणि आकाशदीपने गोलची भर घालत भारताची आघाडी 5-1 अशी वाढवली. अखेरीस हरमनप्रीतने गोल करीत भारताला चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला.
भारतीय महिला पराभूत
डसेलडॉर्फ : भारतीय महिला हॉकी संघाला जर्मनी दौर्‍यातील दुसर्‍या सामन्यात 0-1 असा पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पहिला सामना 0-5 अशा फरकाने गमावला होता. अमेली वॉर्टमन हिने 24व्या मिनिटाला केलेला गोल यजमानांच्या विजयात निर्णायक ठरला. या विजयासह जर्मनीने चार सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply