Breaking News

‘धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा’

मुंबई : प्रतिनिधी

ज्या प्रकारे फक्त सरकार टिकवण्यासाठी किंवा आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठिशी घातले जातेय, ते चुकीचे असून मी त्याचा निषेध करते, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे, तसेच संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीदेखील राजीनामा द्यायला हवा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सोमवारी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. सध्या ज्या प्रकारची उदाहरणे प्रस्थापित केली जात आहेत ती पुढच्या राजकारण्यांसाठी प्रस्थापित होत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, या वेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची तपास यंत्रणांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

मुख्य पीडिता बाजूला राहून वेगळेच राजकारण उभे केले जात आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. तो दिला की घेतला हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. राजीनामा तर दिला, पण आता चौकशीचा मुद्दा आहे. राजीनामा ही चांगलीच गोष्ट झाली. आता यंत्रणांनी नि:पक्षपातीपणे त्या प्रकरणाचा तपास करावा. तसा तो होईल, याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे मुंडे म्हणाल्या.

संजय राठोड आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना पंकजा मुंडेंनी एका वेगळ्या तपास यंत्रणेची आवश्यकता व्यक्त केली. राजकारणात जे लोक  वावरत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल असतील, तर त्याची चौकशी करण्यासाठी आता वेगळी यंत्रणाच लागेल असे दिसतेय, असे त्या म्हणाल्या.

मराठवाड्याच्या विकासाचा 12 आमदारांशी काय संबंध आहे?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापले. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मराठवाड्याच्या विकासाचा 12 आमदारांशी काय संबंध आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मराठवाड्याच्या विकासाचा 12 आमदारांशी काय संबंध आहे? त्या 12 आमदारांपैकी किती मराठवाड्यामधील आहेत? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीचे वक्तव्य केलेले आहे. मराठवाडा हा मागासलेला भाग आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ नियुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठवाड्याचा अनुशेष पाच वर्षे भरण्याचा आपण प्रयत्न करतोय, तरी पुढील 15 वर्षे लागतील मराठवाड्याचा अनुशेष भरण्यासाठी, ज्या पद्धतीची आर्थिक गरज मराठवाड्याची आहे, जशी मराठवाड्याची भौगोलिक रचना आहे. आणि त्याचा या 12 आमदारांशी संबंध लावणे, मला खरंच कळत नाही की ही राजकीय लोकं कोणत्या बुद्धीने काम करत आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply