नागपूर : प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ज्या प्रकारे ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आहेत ते पाहता कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात पोलीस कोणत्या ना कोणत्या दबावात काम करीत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नाहीए, असा आरोप विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, ऑडिओ क्लिप्सची सत्यता तत्काळ तपासली जावी. या क्लिप्समधील आवाजा नेमका कोणाचा आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे, मात्र पोलिसांनी ते समोर आणायला हवे. जेथे गुन्हा झाल्याचे स्पष्ट होत असते अशा प्रकरणात पोलीस सुमोटो कारवाई करून गुन्हा दाखल करू शकतात, मात्र पोलीस ही कारवाई करीत नाहीएत आणि हे चुकीचे आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही
मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण किती गांभिर्याने घेतलेय हे कळत नाही. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य मी ऐकले असून, त्यांनी त्या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेतलेले दिसत नाही, किंवा त्यांनी त्या क्लिप्स ऐकलेल्या दिसत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी म्हणजे कोणाचे आयुष्य उदध्वस्त झाले हे त्यांना कळेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले आहे.